Ultimate magazine theme for WordPress.

नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

नौकरभरतीमध्ये मराठा उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना आज देण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांच्या अंमलबजावणीचा आज मराठा आरक्षणविषयक उपसमितीने आढावा घेतला त्यावेळी हे निर्देश देण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

मराठा आरक्षणविषयक उपसमितीची आज ‘सह्याद्री’ अतिथीगृहात आढावा बैठक अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच त्यांच्या वारसांना नोकरी देणे, आंदोलकावरील गुन्हे मागे घेणे, मराठा आरक्षणामुळे रखडलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील उमेदवारांना न्याय देणे आदी विषयांवर चर्चा झाली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिह्यात वसतिगृह उभारण्याच्या योजनेला गती देण्यासाठी तातडीने सर्व जिह्यांतील जिल्हाधिकाऱयांची बैठक घ्यावी. तसेच आंदोलनात मृत्यू पडलेल्यांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्याची प्रक्रिया 15 जूनपर्यंत पूर्ण करावी, अशा सूचना उपसमितीने यावेळी केल्या.

यावेळी समितीचे सदस्य तथा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव ओ. पी. गुप्ता, बहुजन कल्याण विभागाचे सचिव जयप्रकाश गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे सचिव देशमुख यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.